Monday, July 26, 2010

पाऊस


आला बेभान हा वारा
चाहूल पावसाची घेऊनी
धरती ही सुखावली
शाल लाजेची ओढूनी

विजेची ही तार आली
त्याचा सांगावा घेऊनी
उठा उठा धरणी माते
राजे येताहेत मागुनी

प्रेयसिच्या ओढीने
वरुणराज हा धावत आला
सरसावली मग ही धरा
त्याला आलिंगन देण्या

विरहाने रुसलेल्या धरेला
आणली भेट हिरव्या चोळीची
दिली भरुन ओंजळ तिला
राजाने गार टपोर्‍या मोत्यांची

धरेने शिंपडला स्वागता
सुगंधी असा सडा अत्तराचा
सामावला कणाकणात
परीपूर्ण गंध या पावसाचा

मिठीत पावसाच्या
गेली धरा रंगून
स्वार होऊन सरीवर
आली बघा बहरुन

Tuesday, July 20, 2010

घर तुझं नि माझं



घर तुझं नि माझं
घर आपुल्या प्रेमाचं
मनाच्या इथे जुळल्या तारा
प्रेमाच्या सतत बरसती धारा

घर तुझं नि माझं
घर नितांत मायेचं
गर्द सुरक्षित छायेचा
झिरपतो इथे पाझर प्रेमाचा

घर तुझं नि माझं
घर नात्यांच्या भिंतींचं
घट्ट वीण ही नात्यांची
झालर त्याला विश्वासाची

घर तुझं नि माझं
घर आपुलं आठवणींचं
खेळ खेळतो सुख-दु:खाचा
सारीपाट हा संसाराचा

घर तुझं नि माझं
घर आपुलं आशेचं
छत भक्कम आकांक्षांचं
शीतल थंड चांदण्यांचं

घर तुझं नि माझं
घर आपुलं हक्कचं
साठविलेल्या प्रेमळ आठवणींचं
घर आपुल्या प्रेमाचं

घर तुझं नि माझं
घर तुझं नि माझं
घर आपुल्या प्रेमाचं
घर तुझं नि माझं

प्रवास

आला काळोख दाटूनी
काहूर विचारांचे घेऊनी
दिस नकळत सरला
रातीला एकटेपणा उरला

मन एकाकी एकाकी
गाठ पडे प्रश्नांची
या भयाण काळोखी
घालमेल होई जीवाची

मन गुंतती गुंतती
गुंतल्यात आठवणी
तारे ते बघूनी
डोळा येते मग पाणी

गेला तारा बनण्या
डाव अर्ध्यावर सोडून
थकले मी आता
रथ तुझ्याविना ओढून

लाखो ता‍र्‍यांत त्या
तुला शोधायचे कुठे?
हितगुज तुझ्याशी
आता साधायचे कसे?

नको वाटते आता
रात एकाकी भकास
तुझ्याविना माझा
इथेच थांबावा प्रवास...