Thursday, February 23, 2012

भारत माझा देश आहे


"जहाँ डाल डाल पर
सोने की चिडियाँ
करती है बसेरा
वो भारत देश है मेरा।"

अशा ओळी कधी काळी भारतात गुणगुणल्या जात होत्या.भारतातून सोन्याचा धूर वाहतो अशी या देशाची महती गायली जात होती.आसेतुहिमाचल भारताचे’ वर्णन निरनिराळ्या देशातील कवींनी केले.


वाल्मिकिंनी रामराज्याचे,रविंद्रनाथांनी ’Heaven of freedom'चे तर रामदासांनी आनंदवनभूवनचे स्वप्न फार पूर्वीच पाहिले होते;पण प्रत्यक्षात मात्र ते उतरले नाही आणि उतरले असले तरी काळाच्या ओघात वाहून गेले.प्राचीन काळापासून माझा देश सर्वच बाबतीत समॄद्ध होता,त्याची किर्ती जगभर पसरली होती,पण ती कीर्ती कधी अपकीर्तीत बदलली कळलेच नाही.आज माझा देश वाढती लोकसंख्या,बेकारी,रोगराई,गरिबी या दुष्ट प्रवृत्तींचे ठाणे म्हणून ओळ्खला जातो.या ओळखपत्राला नष्ट करून २१व्या शतकातील भारताची जडणघडण आजवर आपण ज्या खस्ता खाल्ल्या त्यावरून बोध घेऊन व निसर्गाच्या वरदानाचा पुरेपूर फायदा घेऊन आपण करावयांस हवी.

आज हे सगळं लिहायचं कारण म्हणजे, आज ऑफ़िसमधून घरी येत असताना समोरच्या गाडीतला एक माणूस पचकन रस्त्यावर थूंकला,थोडं पुढे गेले आणि एका गाडीत मागे बसलेल्या मॅडमनी बिस्किट खाल्लं आणि कागद मात्र रस्त्यावर टाकला..पोशाखावरून,गाडीवरून दोन्ही माणसं चांगल्या घरातली,चांगली शिकलेली दिसत होती..असा संताप झाला ना...मनात आलं, त्यांना जाऊन म्हणावं एवढी मोठी गाडी आहे स्वत:ची तर त्यातच घाण करावी..
पण असं कसं करणार ना कुणी,कारण गाडी माझी,हक्काची..तिची काळजी घेणं माझं कर्तव्य..
पण देश माझा नाही,रस्ता माझा नाही..फ़क्त लहानपणी शाळेत प्रतिज्ञेत म्हणण्यापुरताच ’भारत माझा देश आहे’ हे वाक्य होतं.
१० वर्ष हे वाक्य नेमानं रोज म्हटलं,पण कृतीतून मात्र ते उतरवता येत नाही..
घर माझं म्हणतो तेव्हा ते स्वच्छ ठेवतो ना,त्या घरात घाण करत नाही..देश माझा म्हणतो पण घरातला कचरा मात्र रस्त्यावर आणून टाकतो.
कुणी चुकिच्या साईडनी ओव्हरटेक केलं कींवा सुसाट वेगानं गाडी चालवत गेलं तर हेच लोकं त्याला हमखास म्हणणार की तुझ्या बापाचा रस्ता आहे का??पण हे म्हणताना ह्यांना हे कळत नाही की जसा रस्ता त्याच्या बापाचा नाही तसा ह्यांच्याही बापाचा नाही ,तेव्हा रस्त्यावर घाण करण्याचा अधिकार ह्यांना कुणी दिला.??

हेच लोकं परदेशात गेल्यावर मात्र अगदी कटाक्षानं कचरापेटिचा वापर करतात.. परका देश ह्यांना स्वच्छ ठेवता येतो पण स्वत:चा देश खराब करताना मात्र थोडीसुद्धा लाज वाटत नाही..

"हि रम्य सिंधू वलयांकित हिंदूभूमी
शोभे नितांत रमणीय सुवर्णभूमी।
विश्वात आज तिजला करण्या समर्थ
तू राष्ट्र राष्ट्र जप मंत्र निजांतरात॥"

आज गरज आहे ती आपल्या देशातल्या प्रत्येक नागरीकाने ह्या मंत्राचे अनुकरण करण्याची..
आजपासून देशाला बदलवण्याची सुरूवात स्वत:च्या घरापासून करूया..
परक्यांना नाही पण आपल्या जवळच्या माणसांना देश खराब करण्यापासून नक्कीच थांबवू शकतो..
आणि मग अभिमानाने म्हणू शकतो

’मेरे पर्वत मेरी नदियॉं,मेरा देश महान है।
प्राणों से भी प्यारा मुझको मेरा हिंदुस्थान है॥3 comments: