Friday, November 19, 2010

प्रेम

आजवर नव्हते ठाव मला
प्रेम कुणावर करतात कशाला?
आजवर नव्हते ठाव मला
प्रेम खरे म्हणतात कशाला?

पण ऐक तुझ्याविन आता
एक क्षणही नकोसा होतो
दुराव्याने तुझ्या
नयनी पूर दाटतो
हाच कदाचित सख्या
प्रेमाचा सागर असतो

तुझ्या संगतीने माझ्या
जिण्याला अर्थ येतो
स्पर्शाने तुझ्या
सर्वांगाला बहर येतो
हाच कदचित
प्रेमाचा अर्थ असतो

आजवर नव्हती ठाव मला
प्रेमाची कुठली असते भाषा
आजवर नव्हती ठाव मला
प्रेमाची कुठली असते दिशा

पण आज आठवासोबत तुझ्या
प्रेमात चिंब भिजते
अनामिक एका स्पर्शाने
हळूच मी थरथरते
असेच काही रे
प्रेमात घडत असते

सहवासात तुझ्या
मनी मोरपिसे फिरती
रोजचेच चंद्र तारे
नवीन आज भासती
यालाच रे जिवलगा
प्रेम असे म्हणती

प्रेमाची ही भाषा
जेव्हा उमजली आज मला
प्रेमाची ही दिशा
जेव्हा गवसली आज मला

मिठीत तुझ्या सामावण्या
बंध तोडूनी मी धावले
ऐक रे हे साजणा
तुझीच आज मी जाहले...

Monday, July 26, 2010

पाऊस


आला बेभान हा वारा
चाहूल पावसाची घेऊनी
धरती ही सुखावली
शाल लाजेची ओढूनी

विजेची ही तार आली
त्याचा सांगावा घेऊनी
उठा उठा धरणी माते
राजे येताहेत मागुनी

प्रेयसिच्या ओढीने
वरुणराज हा धावत आला
सरसावली मग ही धरा
त्याला आलिंगन देण्या

विरहाने रुसलेल्या धरेला
आणली भेट हिरव्या चोळीची
दिली भरुन ओंजळ तिला
राजाने गार टपोर्‍या मोत्यांची

धरेने शिंपडला स्वागता
सुगंधी असा सडा अत्तराचा
सामावला कणाकणात
परीपूर्ण गंध या पावसाचा

मिठीत पावसाच्या
गेली धरा रंगून
स्वार होऊन सरीवर
आली बघा बहरुन

Tuesday, July 20, 2010

घर तुझं नि माझं



घर तुझं नि माझं
घर आपुल्या प्रेमाचं
मनाच्या इथे जुळल्या तारा
प्रेमाच्या सतत बरसती धारा

घर तुझं नि माझं
घर नितांत मायेचं
गर्द सुरक्षित छायेचा
झिरपतो इथे पाझर प्रेमाचा

घर तुझं नि माझं
घर नात्यांच्या भिंतींचं
घट्ट वीण ही नात्यांची
झालर त्याला विश्वासाची

घर तुझं नि माझं
घर आपुलं आठवणींचं
खेळ खेळतो सुख-दु:खाचा
सारीपाट हा संसाराचा

घर तुझं नि माझं
घर आपुलं आशेचं
छत भक्कम आकांक्षांचं
शीतल थंड चांदण्यांचं

घर तुझं नि माझं
घर आपुलं हक्कचं
साठविलेल्या प्रेमळ आठवणींचं
घर आपुल्या प्रेमाचं

घर तुझं नि माझं
घर तुझं नि माझं
घर आपुल्या प्रेमाचं
घर तुझं नि माझं

प्रवास

आला काळोख दाटूनी
काहूर विचारांचे घेऊनी
दिस नकळत सरला
रातीला एकटेपणा उरला

मन एकाकी एकाकी
गाठ पडे प्रश्नांची
या भयाण काळोखी
घालमेल होई जीवाची

मन गुंतती गुंतती
गुंतल्यात आठवणी
तारे ते बघूनी
डोळा येते मग पाणी

गेला तारा बनण्या
डाव अर्ध्यावर सोडून
थकले मी आता
रथ तुझ्याविना ओढून

लाखो ता‍र्‍यांत त्या
तुला शोधायचे कुठे?
हितगुज तुझ्याशी
आता साधायचे कसे?

नको वाटते आता
रात एकाकी भकास
तुझ्याविना माझा
इथेच थांबावा प्रवास...

Friday, April 9, 2010

टाहो

नुरली इथे माणुसकी, नुरली चाड नात्यांची
नुरला इथे प्रेम जिव्हाळा,उरली तहान देहाची
लज्जा,शरम,अब्रू खेळी फ़क्त शब्दांची
किंमत नुरली जगती या शब्दांच्या अर्थाची

भूक देहाची शमविण्या खुडली एक कळी
पुसोनिया कुंकू यातनांचा संग्राम तिच्या भाळी
समाजास लागली वाळ्वी ही नराधमांची
पोखरूनी स्त्रियांना तहान शमवी हे देहाची

शिक्षा होऊनी त्यांना व्रण हे मिटणार नाही
कोमेजलेली कळी परत कधी फुलणार नाही
चर्चा करुनी समाज हा बघा झोपी जाई
स्वग्रूही अघटीत घडण्याची जणू वाट पाही

जोडूनी हात पाय विनविते तुम्हा
माणुसकीला जरा जागे करा
एकाकी स्त्रीचा टाहो हा ऐका जरा
किड ही नष्ट करण्या पेटूनी आता ऊठा जरा.

Friday, March 26, 2010

तुझ्या-माझ्यात

मैत्री अशी तुझ्या-माझ्यात
चांदणं जसं निरभ्र आकाशात
जवळ नसतानाही तू सख्या
सहवास तुझा सतत भासे
एकांतात असताना रे मी
साथ मला ही तुझीच असे

मैत्री अशी तुझ्या-माझ्यात
रिमझिम धारा जशा उन्हात
दिवसभर राब राब राबता
थकवा हा जीवघेणा वाटे
रात्री तुझ्याशी हितगूज साधता
नवा उत्साह मनी बघ साठे

मैत्री अशी तुझ्या-माझ्यात
गंधित फुले जशी या हातात
नजरेसमोर या तू नसता
आठवण तुझी मनात दाटे
सामोरा मग तू येता
मज आकाश ठेंगणे वाटे

मैत्री अशी तुझ्या-माझ्यात
समई तेवते जशी देव्हार्‍यात
मैत्री आपली खळ्खळ हसणारी
हवीहवीशी मला सतत वाटणारी
मैत्री अशी तुझ्या-माझ्यात
जीव सख्या गुंतला रे तुझ्यात

अर्थ कळेना

जगण्याचा या मज अर्थ कळेना
रस्त्याचा या मज शेवट दिसेना,
जणू कळस इथे स्वार्थाचा हो स्वार्थाचा
वर चढे हर एक पाय खेचून दुसर्‍याचा,
कुठेच बघ हा रस्ता संपेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना

नोकरीसाठी शिक्षण असे हे
पैशासाठीच असे ही नोकरी,
समाधान मात्र कुठेच मिळेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना

राब राब राबतो माणूस हा यंत्रागत
सदा सर्वदा अडकलेला व्यवहाराच्या गर्तेत,
प्रेमाचा इथे लवलेश दिसेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना

दु:खात ना कुणी साथी ना सोबती
सुखात मात्र सारे अवती-भवती,
कुणापास बोलावे काही उमजेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना

असे कसे रे जगलो इथवर
पुढे कसे कसे रे जगणार
उत्तर कुठेही बघ हे मिळेना
जगण्याचा या मज अर्थ कळेना

Thursday, March 25, 2010

महती वीरांची

स्वातंत्र्याच्या या होमकुंडात
दिली आहुती ज्यांनी प्राणांची,
किती किती वर्णावी महती
त्या अनाम स्वातंत्र्यवीरांची...

तुळ्शीपत्र ठेविले घरीदारी
भय नव्ह्तेच ज्यांच्या मुखी,
निष्ठा होती ज्यांची देशाप्रती
आस होती फक्त स्वातंत्र्याची,
किती किती वर्णावी महती
त्या अनाम स्वातंत्र्यवीरांची...

तारुण्याची करुनी ज्यांनी होळी
स्वातंत्र्य हे दिले आमच्या झोळी,
इतिहासाची ही पाने ही गाती
कथा ज्यांच्या हो परक्रमाची,
किती किती वर्णावी महती
त्या अनाम स्वातंत्र्यवीरांची...

भविष्य देशाचे उजळविण्या
विझूनी हजारो जे दिवे गेले,
स्वातंत्र्याचा हा सूर्य ही देई
साक्ष ज्यांच्या हो बलिदानाची,
किती किती वर्णावी महती
त्या अनाम स्वातंत्र्यवीरांची...

माय मराठी

अमृताहूनही गोड जी असे
मायेची ऊब जिच्यात भासे,
गर्व जिचा या महाराष्ट्राला
भाषा असे ती आमुची मराठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...

मातीत या वाढलो आम्ही
मातीत या घडलो आम्ही,
अभिमान जिचा असे आम्हाला
नसानसातून ती वाहे मराठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...

संस्कृतीचा मान असे ही
महाराष्ट्राची शान असे ही,
ताकद जिची असे आम्हाला
मनामनातून ती वसे मरठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...

धर्म असू दे कुठलाही
पूत्र आम्ही या मराठीचे,
अभिमान जिचा असे आम्हाला
ह्रुदयात जपतो ती मराठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...

मनातले प्रेम

पक्षी होऊनी ऊडण्या मन हे सरसावले
नवा गंध हा हूंगण्या मन हे रे वेडावले,
वा‍‍र्‌यावरती झूलण्यास मन हे झेपावले
कुणास बघूनी मग इथेच रे थबकले...

मनात माझ्या अलगद कोण हे रे शिरले
मनाचा माझ्या ताबा घेऊनी हसत बसले,
आता माझे हे मन बघ माझे न राहिले
कुणास भुलूनी मग हे स्वत:शीच हरले...

तुला बघितले अन् भानच रे हरपले
पाऊस नसताही मन माझे चिंब भिजले,
कुणास ठाऊक हे कसे अन कधी घडले
पण माझे वेडे मन हे तुजवर जडले...

वारा नसताही मन माझे हे थरथरले
पाणी नसतानाही मन तृप्त हे रे जाहले,
आनंदात मग ते हळूच बघ वदले
तुजवर माझे प्रेम असे जडले...

मनास माझ्या आताशा काय असे झाले
हे मग रे मला सहजच उमजले,
मनाने मनाशी तुझ्या बघ नाते हे जोडले
नात्यास या प्रेमाचे नाव आपण दिधले...

माझा बाबा

किती छान बाबा दिला तू
कसे मी तूला सांगू
त्यासाठी बाप्पा तूला
लाख लाख रे थँक्यू...

ऒफ़िसात तो जातो
कित्ती काम करतो
रात्रीला मग येतो
अन् माझ्याशी खेळतो

माझ्यामागे धावतो
गम्मत माझी करतो
मला रुसलेलं बघून
खुद्कन् बघ हसतो

दूर गावी जातो
पण रोज फोन करतो
कशी आहे छ्कूली
असं लाडात विचारतो

किती छान बाबा दिला तू
कसे मी तूला सांगू
त्यासाठी बाप्पा तूला
लाख लाख रे थँक्यू

ऊन्हा-तान्हाचा माझा बाबा
राब राब राबतो
थकलेला बाबा माझा
उशाशी माझ्या बसतो

झोपलेल्या मला
प्रेमाने तो बघतो
डोक्यावर हात ठेवून
खूप मोठी हो म्हणतो

बरं नसलं मला की
रात्र रात्र जागतो
माझ्या भविष्याची
चिंता सतत करतो

किती छान बाबा दिला तू
कसे मी तूला सांगू
त्यासाठी बाप्पा तूला
लाख लाख रे थँक्यू

आज माझा बाबा
आनंदी दिसतो
ही माझी मुलगी
असे गर्वाने सांगतो

मुळूमुळू रडताना मी
समजूत काढणारा बाबा
आज दूर पाठवून मला
कसा रडतोय बघा

बाबाविना माझ्या
आयुष्य माझं ऊणं
जन्मोजन्मी हाच बाबा दे
हेच तूला मागणं

किती छान बाबा दिला तू
कसे मी तूला सांगू
त्यासाठी बाप्पा तूला
लाख लाख रे थँक्यू