Monday, February 25, 2013

अलंकार


अलंकार म्हणजे भूषण, दागिने.

अलंकाराचे दोन प्रकार := १) शब्दालंकार २) अर्थालंकार


१) शब्दालंकार


१.१ ) यमक := 


एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्यात चरणान्ती आले की तेथे "यमक" अलंकार होतो.
उदा. -> मना चंदनाचे परित्वा झिजावे।
         परी अंतरी सज्जना निववावे॥

२) अर्थालंकार


२.१ ) उपमा := 


उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते तेथे "उपमा" अलंकार होतो.
उद. -> दावी न गर्व विभवे गुण घे पराचे ।
        खड्गाग्र तुल्य विषम व्रत हे भल्याचे ॥

     

 २.२) उत्प्रेक्षा :=


उपमेय जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे "उत्प्रेक्षा" अलंकार होतो.
उदा. -> विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही.

२.३) अनूप्रास := 


कवितेमध्ये एकच अक्षर पून्हा पून्हा आल्याने नाद निर्माण होत असेल तर तेथे अनूप्रास   अलंकार होतो.
उदा. -> १) राधाधर मधु मिलींद जय जय रमारमण हरी गोविंद ।
                २) हटातटाने पटा रंगवूनी जटा धरिशि का शिरी ।
मठाची उठाठेव का करी ॥
                ३) कुरू कटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला ।
स्वपर बळाबळ नेणुनी बालिष बहू बायकात पडला ॥

२.४ ) रूपक := 

उपमेय,उपमान यांच्यात कोणताही फरक नाही, ते दोन्ही एकरूप आहेत असे जेथे वर्णन असते तेथे रूपक  अलंकार होतो.
उदा. -> १) रामाचा मूखचंद्र पाहून कौशल्येला आनंद झाला.
                २) देवाच्या पदकमलावर भक्ताने डोके ठेवले.

२.५ ) श्लेष := 


कवितेत किंवा गद्यात एकाच शब्दाचे दोन अर्थ झाल्यामुळे चमत्कृती निर्माण होत असेल तर  तेथे श्लेष      अलंकार होतो.
उदा. -> १) मित्राच्या आगमनाने कोणाला आनंद होत नाही!
                २) हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस.

श्लेषाचे दोन प्रकार आहेत.

२.५.१ ) शब्दश्लेष := 

वाक्यातील श्लेषाऐवजी दुसरा शब्द वापरल्यास तेथील श्लेष नाहीसा होत असेल तर तेथे शब्दश्लेष होतो.

२.५.२ ) अर्थश्लेष := 

वाक्यातील श्लेषाऐवजी दुसरा शब्द वापरूनसूद्धा तेथील श्लेष नाहीसा होत नसेल तर  तेथे अर्थश्लेष होतो.Thursday, May 24, 2012

वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा


आरक्त देखिली डोळा ग्रासिले सूर्यमंडळा ||

वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा ||

व्हायचा तो कहर झालाच. १-१ पायरी वर चढत सामान्य जनतेची गळचेपी करू पाहणारया सरकारने आज शेवटी एकदाची उंच भरारी घेतलीच.

१-२ रुपयांनी होणारी पेट्रोल वाढ काल चक्क ७.५० रुपयांनी झाली. आपल्या मेहनतीचा १-१ रुपया वाचवण्यासाठी जो तो काल २-२ तास पेट्रोल पंपावर रांग लावून उभा होता. पण जिथे सरकारलाच आपल्या जनतेशी काही देणं-घेणं नाही तिथे इतर कुणी कशाला पर्वा करणार.
त्यामुळे आपल्या अतिशहाण्या पंपधारकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी पंप काल संध्याकाळी ६ वाजताच बंद केले.

मागच्या ३ वर्षात आपल्या नेत्यांना भरपूर खायची सवय झाल्यामूळे त्यांची भूक दिवसेंदिवस वाढतेच आहे. आपली भूक शमवण्यासाठी आपले हे पुढारी so called नेते
सामान्य जनतेचे खिसे अक्षरशः कापून काढत आहेत.
आज सरकारला सत्तेवर येऊन ३ वर्ष पूर्ण झालीत आणि ह्या ३ वर्षात आपण जनतेला भरभरून दिलं असा काहीतरी समज करून घेउन हे जणू जनतेकडून return gift वसूल करत आहेत.
ह्यांच्यापेक्षा तर ते दरोडेखोर परवडले जे निदान बंदूकीचा धाक दाखवून आपल्याकडून पैसे घेतात पण आपले हे नेते ज्यांना आपणच मतं देऊन सत्तेवर बसवलं ते मात्र स्वतःचा बंगला बांधण्यासाठी आपल्याला झोपडीचा रस्ता दाखवत आहेत.

ह्यांनी चालवलेल्या या महागाई मेळाव्यात सामान्य माणसाचा टिकाव कसा लागणार??
आज पेट्रोल आवाक्याबाहेर गेले तेव्हा सामन्य माणसाने गरजेपुर्तीच गाडी वापरण्याचा संकल्प केला.
आजच्या वृत्तपत्रात ठळक बातमी काय असणार ह्याची सगळ्यांना आधीच कल्पना होती. पण आज एकदाची बातमी वाचली आणि पोराला ऑफिसला जायला गाडी आवश्यक तेव्हा मी किराणा आणायला पायी जातो हे प्रत्येक मध्यमवर्गीय बापाने सकाळी घरात आपल्या मनाशी पक्के केले असणार.
उद्या सिलेंडर आवाक्याबाहेर जाईल तेव्हा हे माय बाप आपल्या पोराला पोटभर खाऊ घालण्यासाठी,त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आठवड्यातून एकच दिवस जेवायलाही मागे पुढे बघणार नाहीत.

आज शेतकरी आत्महत्या करतो आहे उद्या मात्र महागाई ह्या रोगाने ग्रासलेला सामान्य माणूसही हेच पाउल उचलेल.
पण सरकारला त्याची पर्वा कुठे?? सरकारला तर आपले खिसे भरण्याशी मतलब.

गुलामगिरीने ग्रासलेल्या भारताला वाचवण्यासाठी गांधी,टिळक,सावरकर,आझाद,भगतसिंग सगळे एकत्र आले.
पण आज भ्रष्टाचार,महागाई ह्यांनी पोखरल्या जाणारया,अवनती कडे झुकणारया या भारताला कोण वाचवणार??

म्हणतात ना बाहेरच्या शत्रूशी २ हात करणं सोपं असतं पण परिस्थिती जर "घर का भेदी लंका ढाये" अशी असेल तर मात्र कठीण होउन बसतं.

पण १ दिवस चिडचिड करणं, लिहून बोलून आपल्या मनातली भडास काढणं यापलीकडे सामान्य माणूस करू तरी काय शकतो?
फक्त या नेत्यांच्या साचलेल्या चिखलात एखादा कमळ उमलण्याची वाट बघू शकतो.

When we are sick, we want an uncommon doctor; when we have a construction job to do, we want an uncommon engineer, and when we are at war, we want an uncommon general. It is only when we get into politics that we are satisfied with the common man. -- Herbert HooverThursday, March 22, 2012

गुढीपाडवाधरणीस पांघराया नवा शेला
शिशिर सरूनी वसंत आला
कोकीळेच्या सुरांसोबत
दारी चैत्र पाडवा आला...

आली पहाट सोनेरी
ब्रम्हध्वज चढला नभी
तनी मनी बरसती
चैतन्याच्या सरी...

निळ्या निळ्या आभाळी
बघा चढली ही गुढी
हिरवा साज चढवूनी
राहे थाटात उभी...

कडुनिंबासोबत राही
साखरेची गाठी
नव्या स्वप्नांनी लिहू
नववर्षाची पाटी...

नवा बहर, नवा मोहर
नवी दिशा, नवी आशा
उभारूनी गुढी मराठी अस्मितेची
वाढवू शान आज परंपरेची...

Tuesday, March 6, 2012

होळी

रंगात न्हाऊ
आज मस्तीत गाऊ
नवे सूर छेडण्या
चला धुंद होऊ सारे...

कवाड उघडूनी
या बेधुंद मनाचे
वाहू द्या वारे
हजारो रंगांचे...

पोळी पुरणाची
नशा रंगांची
नशेत या बुडूनी
मदमस्त होऊ सारे...

ओसाड उजाड
या धरतीवरती
हिरवा गालीचा
पसरवू चला रे...

त्या ऊंच आभाळी
देऊ निळी छटा
नवचैतन्य पसरविण्या
उधळू रंग पिवळा रे...

लाल गुलाबी रंग प्रेमाचे
उधळूनी या आसमंतात
भान विसरूनी या रंग दुनियेत
आज चिंब चिंब होऊ सारे...

Saturday, March 3, 2012

ओळख

गोर्‍या गोर्‍या गालावर चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली..
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली..

हे सूर अजुनही कानात घुमत आहेत..या सुरांच्या संगतीत,आप्तांच्या सहवासात दिवस कसे पटकन सरले कळलंच नाही..लग्न होऊन १५ दिवस झाले..लग्नसोहळा,पूजा सगळं आटोपलं..
पाहूणे मंडळीही आपापल्या गावी परत गेली..

नवी स्वप्न,नवा जोश घेऊन मीही माझ्या नवर्‍यासोबत पुण्यात परतले..
रूटीन सुरू झालं.नवं घर,ऑफीस यांचा ताळमेळ बसवताना तारेवरची कसरत सुरू होती.नवं घर,नवं सामान,नवे स्वप्न,नव्या जबाबदार्‍या,नवे कर्तव्य..सगळं कसं नवं नवं होतं..

हे मन ही नव्या उत्साहात वावरत होतं..ह्या सगळ्या नव्या गोष्टींचं अप्रूप वाटत असतानाच एका नव्या गोष्टीच्या विचाराने मात्र मनात कुठेतरी कालवा-कालव झाली..
मागच्या ३ वर्षांपासूनच घरापासून दूर राहत असल्यामूळे,love maariage असल्यामूळे आणि इथे फक्त मी आणि माझा नवराच राहत असल्यामूळे इथली परिस्थिती खूप बदलल्यासारखी वाटत नव्हती..त्यामुळे रूटीनमधे adjust व्हायला फार काही वेळ लागला नाही..
आपलं लाईफ खूप कही बदललं नाही असं वाटत असतानाच एका प्रश्नानं मात्र मनाची उलथापालथ केली..
असंच परवा ऑफीसमधून घरी आले तेव्हा लीफ्टमधे एक काकू भेटल्या..ओळख करून घेण्याच्या निमित्त्याने थोडंसं बोलणं झाल्यावर त्यांनी नाव विचारलं आणि त्या प्रश्नासरशी चक्कं मला अडखळायला झालं.
आणि मग नकळत डोक्यात विचारचक्र फिरायला लागलं..
आजपर्यंत ज्या प्रश्नाचं ठसक्यात उत्तर द्यायचो त्या इतक्या सोप्या प्रश्नाने मी का अडखळले??
माहेरचं आडनाव सांगावं का सासरचं असा तो संभ्रम होता..
आजपर्यंत जे नाव अभिमानानं,गर्वानं सांगत आले होते ती माझी ओळख अचानक पुसल्या जाणार ह्या जाणिवेने मन कावरं-बावरं झालं..

गेली २५ वर्ष जे नाव मी जगत होते,ज्या नावानं माझी शाळा,माझं कॉलेज,माझे शिक्षक,माझे मित्र-मैत्रिणी,माझे सहकारी,सगळे सगळे ज्या नावानी मला ओळखत होते ती माझी ओळख बदलणार होती..ज्या नावाने आजपर्यंत अनेक स्पर्धा जिंकल्या,अनेक बक्षिसं मिळवली यापुढे ते नाव फक्त त्या सर्टिफिकेट्समधून,त्या ट्रॉफीजमधूनच झळकणार ही जाणीव मन सून्न करून गेली..
आणि मग मनाचं द्वंद्व युद्ध सुरू झालं..का मुलींनाच त्यांची ओळख बदलावी लागते??का लहानपणापसून मनात जपलेलं हे नाव,ही ओळख बदलायची??ज्या नावानं जन्म घेतला ते नाव ऐन आयुष्य बहरायला सुरूवात झाली असताना पुसून टाकायचं..

पण शेवटी या युद्धात संस्कृती,परंपरा यांचा विजय झाला..आणि पुर्वीपासून चालत आलेली ही रूढी मलाही स्वीकारावी लागणार याची जाणीव झाली..
आणि शेवटी मनाला सांगितलं की आता विचार करणं पुरे कर.
त्या घरची कितीही लाडकी लेक असलीस तरी आता या घरची सून झालेली आहेस..
आणि आता ही नवी ओळख घेऊन पुन्हा एकदा स्वत:ला एक नवं अस्तित्व मिळवून द्यायचं आहे..
बाकिच्या नव्या जबाबदार्‍यांसोबत हे नवं नाव स्वीकारायचं..

यापुढे जरी ही नवी ओळख घेऊन वावरायचं असलं तरी ती जुनी ओळख,जुनं नाव,जुनं अस्तित्व मनाच्या एका कोपर्‍यात असच कुठेतरी दडून राहणार,मला माझ्या जुन्या आठवणींमधे घेऊन जाण्यासाठी..

Thursday, February 23, 2012

भारत माझा देश आहे


"जहाँ डाल डाल पर
सोने की चिडियाँ
करती है बसेरा
वो भारत देश है मेरा।"

अशा ओळी कधी काळी भारतात गुणगुणल्या जात होत्या.भारतातून सोन्याचा धूर वाहतो अशी या देशाची महती गायली जात होती.आसेतुहिमाचल भारताचे’ वर्णन निरनिराळ्या देशातील कवींनी केले.


वाल्मिकिंनी रामराज्याचे,रविंद्रनाथांनी ’Heaven of freedom'चे तर रामदासांनी आनंदवनभूवनचे स्वप्न फार पूर्वीच पाहिले होते;पण प्रत्यक्षात मात्र ते उतरले नाही आणि उतरले असले तरी काळाच्या ओघात वाहून गेले.प्राचीन काळापासून माझा देश सर्वच बाबतीत समॄद्ध होता,त्याची किर्ती जगभर पसरली होती,पण ती कीर्ती कधी अपकीर्तीत बदलली कळलेच नाही.आज माझा देश वाढती लोकसंख्या,बेकारी,रोगराई,गरिबी या दुष्ट प्रवृत्तींचे ठाणे म्हणून ओळ्खला जातो.या ओळखपत्राला नष्ट करून २१व्या शतकातील भारताची जडणघडण आजवर आपण ज्या खस्ता खाल्ल्या त्यावरून बोध घेऊन व निसर्गाच्या वरदानाचा पुरेपूर फायदा घेऊन आपण करावयांस हवी.

आज हे सगळं लिहायचं कारण म्हणजे, आज ऑफ़िसमधून घरी येत असताना समोरच्या गाडीतला एक माणूस पचकन रस्त्यावर थूंकला,थोडं पुढे गेले आणि एका गाडीत मागे बसलेल्या मॅडमनी बिस्किट खाल्लं आणि कागद मात्र रस्त्यावर टाकला..पोशाखावरून,गाडीवरून दोन्ही माणसं चांगल्या घरातली,चांगली शिकलेली दिसत होती..असा संताप झाला ना...मनात आलं, त्यांना जाऊन म्हणावं एवढी मोठी गाडी आहे स्वत:ची तर त्यातच घाण करावी..
पण असं कसं करणार ना कुणी,कारण गाडी माझी,हक्काची..तिची काळजी घेणं माझं कर्तव्य..
पण देश माझा नाही,रस्ता माझा नाही..फ़क्त लहानपणी शाळेत प्रतिज्ञेत म्हणण्यापुरताच ’भारत माझा देश आहे’ हे वाक्य होतं.
१० वर्ष हे वाक्य नेमानं रोज म्हटलं,पण कृतीतून मात्र ते उतरवता येत नाही..
घर माझं म्हणतो तेव्हा ते स्वच्छ ठेवतो ना,त्या घरात घाण करत नाही..देश माझा म्हणतो पण घरातला कचरा मात्र रस्त्यावर आणून टाकतो.
कुणी चुकिच्या साईडनी ओव्हरटेक केलं कींवा सुसाट वेगानं गाडी चालवत गेलं तर हेच लोकं त्याला हमखास म्हणणार की तुझ्या बापाचा रस्ता आहे का??पण हे म्हणताना ह्यांना हे कळत नाही की जसा रस्ता त्याच्या बापाचा नाही तसा ह्यांच्याही बापाचा नाही ,तेव्हा रस्त्यावर घाण करण्याचा अधिकार ह्यांना कुणी दिला.??

हेच लोकं परदेशात गेल्यावर मात्र अगदी कटाक्षानं कचरापेटिचा वापर करतात.. परका देश ह्यांना स्वच्छ ठेवता येतो पण स्वत:चा देश खराब करताना मात्र थोडीसुद्धा लाज वाटत नाही..

"हि रम्य सिंधू वलयांकित हिंदूभूमी
शोभे नितांत रमणीय सुवर्णभूमी।
विश्वात आज तिजला करण्या समर्थ
तू राष्ट्र राष्ट्र जप मंत्र निजांतरात॥"

आज गरज आहे ती आपल्या देशातल्या प्रत्येक नागरीकाने ह्या मंत्राचे अनुकरण करण्याची..
आजपासून देशाला बदलवण्याची सुरूवात स्वत:च्या घरापासून करूया..
परक्यांना नाही पण आपल्या जवळच्या माणसांना देश खराब करण्यापासून नक्कीच थांबवू शकतो..
आणि मग अभिमानाने म्हणू शकतो

’मेरे पर्वत मेरी नदियॉं,मेरा देश महान है।
प्राणों से भी प्यारा मुझको मेरा हिंदुस्थान है॥Saturday, December 3, 2011

पाऊस प्रेमाचा


ती चिंब भिजलेली,तो ही चिंब भिजलेला
त्या दोघांमधे आज पाऊस मनसोक्त बरसला..

मिठीतला बंध,रात ही धुंद,
दोघांच्या नजरेत प्रेमाचे प्रतिबिंब..

रेशमी स्पर्शाचे हातात हात,
दोघांची एकमेकांना मखमली साथ..

कंप ओठांना भासला
श्वासात अडकला श्वास,
प्रेमाचा पाऊस असा बरसला
हे सत्य असे की भास..