Monday, January 24, 2011

तू आणि मी

या जीवनप्रवासाच्या वाटेवरुन चालताना
तू आणि मी...

आपल्या स्वप्नातल्या घरकुल बघतोय
तू आणि मी...

गवताच्या पात्यांवरल्या मनमोहक दवबिंदूंना न्याहाळ्तोय
तू आणि मी...

पावसाच्या रिमझिम सरींना बिलगण्याचा प्रयत्न करतोय
तू आणि मी...

हिवाळ्यातलं शिरशिरणारं ऊन झेलण्याचा आनंद उपभोगतोय
तू आणि मी...

एकमेकांना आधार देण्याचा अट्टाहास करतोय
तू आणि मी...

ही सारी स्वप्नं डोळ्यात साठवून नवी सुरूवात करतोय
तू आणि मी...

या जीवनप्रवासाच्या वाटेवरुन चालताना
तू आणि मी...

कुणीतरी असावं

कुणीतरी असावं भावना जपणारं
दु:खावर हळूच फुंकर घालणारं

कुणीतरी असावं हक्कानं रागावणारं
वेळ्प्रसंगी कौतूक करणारं

कुणीतरी असावं खूप खूप चिडवणारं
अगदी खळखळून हसवणारं

कुणीतरी असावं स्वप्नात येणारं
कल्पनेच्या नव्या जगात नेणारं

कुणीतरी असावं खूप प्रेम देणारं
जन्मभराची सोबत करणारं

कुणीतरी असावं आपलसं म्हणणारं
चुका विसरून माफ करणारं

कुणीतरी असावं अधीरतेने वाट बघणारं
उगीच रागानं रुसून बसणारं

कुणीतरी असावं मनधरणी करणारं
इच्छा-आकांक्षांना पुरून उरणारं

कुणीतरी असावं प्रेमाचं पांघरुण घालणारं
हक्काचं असं मजजवळ कुणीतरी असावं

किमया आईची

चिमुकल्या देहाला
भेट देई श्वासांची
देई ओळख त्याला
नव्या एका सृष्टीची
अनोखी किमया ही
असे फक्त आईची

निरर्थक हुंकारांना
साथ देई शब्दांची
अल्लड विचारांना
देई गती स्वप्नांची

धगधगणार्‍या देहाला
गारवा देई मायेचा
कुडकुडणार्‍या मनाला
देई ऊब प्रेमाची
अनोखी किमया ही
असे फक्त आईची

उडू पाहणार्‍या पाखरांना
पंख देई सामर्थ्याचे
निराशल्या मनाला
देई उभारी विश्वासाची

जग जिंकूनी सारे
व्यथा काय सिकंदराची
स्वामी असूनी जगताचा
देवा उपाधी भिकार्‍याची
भूक त्यांनाही बघा
असे फक्त आईची