गोर्या गोर्या गालावर चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली..
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली..
हे सूर अजुनही कानात घुमत आहेत..या सुरांच्या संगतीत,आप्तांच्या सहवासात दिवस कसे पटकन सरले कळलंच नाही..लग्न होऊन १५ दिवस झाले..लग्नसोहळा,पूजा सगळं आटोपलं..
पाहूणे मंडळीही आपापल्या गावी परत गेली..
नवी स्वप्न,नवा जोश घेऊन मीही माझ्या नवर्यासोबत पुण्यात परतले..
रूटीन सुरू झालं.नवं घर,ऑफीस यांचा ताळमेळ बसवताना तारेवरची कसरत सुरू होती.नवं घर,नवं सामान,नवे स्वप्न,नव्या जबाबदार्या,नवे कर्तव्य..सगळं कसं नवं नवं होतं..
हे मन ही नव्या उत्साहात वावरत होतं..ह्या सगळ्या नव्या गोष्टींचं अप्रूप वाटत असतानाच एका नव्या गोष्टीच्या विचाराने मात्र मनात कुठेतरी कालवा-कालव झाली..
मागच्या ३ वर्षांपासूनच घरापासून दूर राहत असल्यामूळे,love maariage असल्यामूळे आणि इथे फक्त मी आणि माझा नवराच राहत असल्यामूळे इथली परिस्थिती खूप बदलल्यासारखी वाटत नव्हती..त्यामुळे रूटीनमधे adjust व्हायला फार काही वेळ लागला नाही..
आपलं लाईफ खूप कही बदललं नाही असं वाटत असतानाच एका प्रश्नानं मात्र मनाची उलथापालथ केली..
असंच परवा ऑफीसमधून घरी आले तेव्हा लीफ्टमधे एक काकू भेटल्या..ओळख करून घेण्याच्या निमित्त्याने थोडंसं बोलणं झाल्यावर त्यांनी नाव विचारलं आणि त्या प्रश्नासरशी चक्कं मला अडखळायला झालं.
आणि मग नकळत डोक्यात विचारचक्र फिरायला लागलं..
आजपर्यंत ज्या प्रश्नाचं ठसक्यात उत्तर द्यायचो त्या इतक्या सोप्या प्रश्नाने मी का अडखळले??
माहेरचं आडनाव सांगावं का सासरचं असा तो संभ्रम होता..
आजपर्यंत जे नाव अभिमानानं,गर्वानं सांगत आले होते ती माझी ओळख अचानक पुसल्या जाणार ह्या जाणिवेने मन कावरं-बावरं झालं..
गेली २५ वर्ष जे नाव मी जगत होते,ज्या नावानं माझी शाळा,माझं कॉलेज,माझे शिक्षक,माझे मित्र-मैत्रिणी,माझे सहकारी,सगळे सगळे ज्या नावानी मला ओळखत होते ती माझी ओळख बदलणार होती..ज्या नावाने आजपर्यंत अनेक स्पर्धा जिंकल्या,अनेक बक्षिसं मिळवली यापुढे ते नाव फक्त त्या सर्टिफिकेट्समधून,त्या ट्रॉफीजमधूनच झळकणार ही जाणीव मन सून्न करून गेली..
आणि मग मनाचं द्वंद्व युद्ध सुरू झालं..का मुलींनाच त्यांची ओळख बदलावी लागते??का लहानपणापसून मनात जपलेलं हे नाव,ही ओळख बदलायची??ज्या नावानं जन्म घेतला ते नाव ऐन आयुष्य बहरायला सुरूवात झाली असताना पुसून टाकायचं..
पण शेवटी या युद्धात संस्कृती,परंपरा यांचा विजय झाला..आणि पुर्वीपासून चालत आलेली ही रूढी मलाही स्वीकारावी लागणार याची जाणीव झाली..
आणि शेवटी मनाला सांगितलं की आता विचार करणं पुरे कर.
त्या घरची कितीही लाडकी लेक असलीस तरी आता या घरची सून झालेली आहेस..
आणि आता ही नवी ओळख घेऊन पुन्हा एकदा स्वत:ला एक नवं अस्तित्व मिळवून द्यायचं आहे..
बाकिच्या नव्या जबाबदार्यांसोबत हे नवं नाव स्वीकारायचं..
यापुढे जरी ही नवी ओळख घेऊन वावरायचं असलं तरी ती जुनी ओळख,जुनं नाव,जुनं अस्तित्व मनाच्या एका कोपर्यात असच कुठेतरी दडून राहणार,मला माझ्या जुन्या आठवणींमधे घेऊन जाण्यासाठी..